पाणीपुरवठ्यासाठी कुटगीरी येडगेवाडी ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाचा इशारा
संगमेश्वर : सचिन पाटोळे
दि.२६: ग्रुप ग्रामपंचायत राजिवली अंतर्गत कुटगीरी येडगेवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गणपत येडगे, अनंत येडगे, शंकर येडगे, यशवंत येडगे व हरिचंद्र येडगे यांनी ग्रामपंचायतीकडे दिलेल्या निवेदनात जिल्हा परिषद विहिरीवरून पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यास परवानगी मिळूनही काही व्यक्तींकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी स्वतःच्या खर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र संबंधित पाईपलाईन तोडण्यात आल्याने ग्रामस्थांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी १७ एप्रिल २०२६ रोजी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर १ जून २०२६ रोजी पाईपलाईन टाकण्यास अधिकृत परवानगी मिळावी यासाठी अर्जही सादर करण्यात आला. मात्र अडीच महिन्यांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे सांगण्यात आले. महिलांना, लहान मुलांना आणि वृद्ध नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून विहिरीकडे जाणारी पायवाट बंद करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. व्हिडिओमध्ये महिलांना दूरवरून पाणी आणताना आणि चिखलमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत असल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, “पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून त्यात अडथळा निर्माण करणे हे कायद्याने गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरू शकते.” सार्वजनिक पाणीपुरवठा रोखणे, शासकीय परवानगीच्या कामात अडथळा आणणे किंवा ग्रामस्थांना त्रास देणे याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) सार्वजनिक सुविधा बाधित करणे, शासकीय कामात अडथळा आणणे किंवा नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर गदा आणणे हे दंडनीय कृत्य मानले जाऊ शकते, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, संबंधित अडथळे दूर करावेत आणि दोषींवर कारवाई करावी; अन्यथा ग्रुप ग्रामपंचायत राजिवली कार्यालयासमोर सर्व कुटुंबीयांसह आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.