ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायदे व हक्काबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.२: ज्येष्ठ नागरिकांना कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा, सवलती आणि हक्कांची प्रभावी माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिले.

ज्येष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) गजानन सरगर, समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बि. दा. सारंगकर, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त अश्विनी पाटील, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या डॉ. वैशाली पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप कोटकर, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षणाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या वयोवंदना आरोग्य योजनेबाबत जनप्रबोधन करावे, आरोग्य विभाग, पोलीस विभाग व महानगरपालिका यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांची माहितीचा अधिकाधिक प्रसार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी असल्यास 1090 व 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, ज्येष्ठांसाठी नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी त्यांना प्राधान्य द्यावे, आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध ठेवावेत आणि आरोग्य सेवा अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.
ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी विरंगुळा केंद्रे सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया गतीमान करावी, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती अभियान राबवावे. ग्रामीण भागात एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस पाटील यांनी महिन्यातून किमान एकदा त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि आवश्यक ती माहिती संबंधित प्रशासनाला द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी 23 ते 25 जून या कालावधीत जिल्ह्यात चार आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. आगामी काळातही अशा उपक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करून त्यांचे जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक व सुलभ करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.