मोबाईल स्नॅचिंग प्रकरणाचा उलगडा; तीन आरोपी अटक, १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी :नियाझ खान
दि.२३ जुलै २०२६: अलोटे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी उलगडा करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल व गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २१ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास पवारवाडी फाटा येथे फिर्यादी आशिष कृष्णा जाधव यांना चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर सुमारे ७.१५ वाजता विरगाव रहाटवाडी येथील दत्त मंदिरासमोर रिया रोहित शिंदे यांच्याकडील मोबाईलही याच पद्धतीने हिसकावून आरोपी पसार झाले होते.
या प्रकरणी अलोटे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तात्काळ तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली होती.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पथकाने २२ जुलै २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे कारवाई करून विश्वनाथ अमर शिंदे (वय २३), प्रथमेश मलिक मोटे (वय २०) व अक्षय संभाजी जाधव (वय २३) या तिघांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल अलोटे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन डेटे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आवेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर व चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कावळे यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.