गणपतीपुळे दुर्घटनेतील शोध मोहिमेत मोलाची कामगिरी; भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी पोलीस दलाकडून गौरव

रत्नागिरी :नियाझ खान 

दि.२६ जुलै २०२६ : गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडलेल्या दुर्दैवी बुडीत दुर्घटनेनंतर प्रतिकूल परिस्थितीत रत्नागिरी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून शोध मोहीम यशस्वी करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

२०  जून २०२६  रोजी सकाळी सुमारे १० .०० वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीडकीन येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या १९ जणांच्या समूहातील आठ पर्यटक समुद्रात उतरले. समुद्रातील पाण्याची खोली आणि लाटांचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने ते बुडाले. स्थानिक जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत तिघा पर्यटकांचे प्राण वाचवले. मात्र, पाच तरुण बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलीस दलाने तातडीने मोटारबोटींच्या सहाय्याने युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी पोलीस दल, भारतीय तटरक्षक दल आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त पथकांनी समुद्रात व्यापक शोधकार्य राबविले.

भारतीय तटरक्षक दलाने अत्याधुनिक मोटारबोटी, प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने उधाणाचा समुद्र, प्रचंड लाटा आणि प्रतिकूल हवामान अशा अत्यंत कठीण परिस्थितीतही अखंडपणे शोधकार्य सुरू ठेवले. रत्नागिरी पोलीस दलाशी उत्कृष्ट समन्वय साधत त्यांनी अथक प्रयत्न केले. या धाडसी आणि समर्पित कार्यामुळे अखेरीस सर्व बेपत्ता पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात यश आले.

या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतीय तटरक्षक दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या धाडसी, शिस्तबद्ध आणि समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच संपूर्ण शोध मोहिमेदरम्यान दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आभार व्यक्त केले. संयुक्त समन्वय, तत्परता आणि सेवाभावामुळे ही शोध मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.