रत्नागिरी पोलीस दलाकडून होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण; पावसाळ्यातील सेवेसाठी सुरक्षिततेला प्राधान्य

रत्नागिरी :सचिन पाटोळे 

दि.२७ जुलै २०२६ : पावसाळ्यात प्रतिकूल हवामानातही सागरी सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने रेनकोट वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला. दि. 24 जुलै 2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक व्ही. व्ही. महामुनी यांच्या हस्ते उपस्थित होमगार्ड जवानांना रेनकोटचे वितरण करण्यात आले.

         रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक परिस्थितीतही होमगार्ड जवान सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त, विविध संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत असतात. अशा कठीण परिस्थितीत त्यांना अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि सक्षमपणे कर्तव्य बजावता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

       यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी होमगार्ड जवानांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत होमगार्ड जवान बजावत असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पावसाळ्यात स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत सतर्कता, जबाबदारी आणि शिस्तीने कर्तव्य पार पाडण्याच्या सूचना त्यांनी जवानांना दिल्या.

या उपक्रमामुळे होमगार्ड जवानांचे मनोबल उंचावण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेबाबत रत्नागिरी पोलीस दलाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.