बालचमूंच्या सादरीकरणातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची उजळणी

इचलकरंजी:जाज मुजावर 

दि. ७ : बालरंगभूमी परिषद, इचलकरंजी शाखेच्या वतीने ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थानच्या प्रांगणात करण्यात आले. बालचमूंच्या प्रभावी सादरीकरणातून अहिल्यादेवींचे शौर्य, पराक्रम, शिक्षण, सामाजिक कार्य आणि प्रेरणादायी जीवनकार्याची उपस्थितांना ओळख करून देण्यात आली.बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती मुंबई शाखेच्या अध्यक्षा ॲड. निलमताई शिर्के-सामंत यांच्या संकल्पनेतून ‘इतिहास महाराष्ट्राचा’ हा उपक्रम महाराष्ट्रातील सुमारे २७ शाखांमध्ये राबविला जातो. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री, अनेकपात्री, स्वगत, नाट्यछटा आदी प्रकारांमध्ये सादरीकरण करण्यासाठी बालकलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

             कार्यक्रमाचे उद्घाटन बालकलाकार व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजू पुजारी, बालरंगभूमी परिषद इचलकरंजी शाखाध्यक्ष मनीष आपटे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, समन्वयक प्रा. मिलिंद दांडेकर, उपाध्यक्ष संजय सातपुते, कार्याध्यक्षा सौ. गौरी पाटील यांच्यासह शिक्षक, पालक व बालकलाकार उपस्थित होते.

            नगरसेवक राजू पुजारी यांच्या हस्ते सहभागी शिक्षक व पालकांचा ‘वंदेमातरम्’ फ्रेम तसेच पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून प्रा. मिलिंद दांडेकर, संजय सातपुते व मनीष आपटे यांनी काम पाहिले. श्रीपाद कुलकर्णी व सौ. गौरी पाटील यांच्या हस्ते बालकलाकारांना खाऊचे वाटप करण्यात आले.

              यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक राजू पुजारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास व त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे सांगितले. बालकलाकारांच्या माध्यमातून अहिल्यादेवींचे कार्य जिवंत ठेवण्याचे काम बालरंगभूमी परिषदेकडून होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

                         स्पर्धेची सुरुवात स्वगत व एकल सादरीकरणाने झाली. त्यानंतर समूह गटातील बालकलाकारांनी अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती साभिनय सादरीकरण, ओवीबद्ध गायन, नृत्य व गायनाच्या माध्यमातून प्रभावीपणे उपस्थितांपर्यंत पोहोचवली. बालकलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्यावर संस्कृती, इतिहास व परंपरांचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने असे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

                        या स्पर्धेत सुमारे २० बालकलाकारांनी एकल व समूह गटात सहभाग घेतला. विकास विद्या मंदिर, तात्यासाहेब मुसळे बालवाडी तथा बाल विद्या मंदिर आणि कै. बाळकृष्ण सांगले विद्या मंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

                         एकल गटातील निकाल :
कै. बाळकृष्ण सांगले विद्या मंदिरची कु. अनन्या अभिजीत डाके हिने सर्वोत्कृष्ट, तर कु. काव्या योगेश कडतारे हिने उत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक पटकावले. विकास विद्या मंदिरची कु. भूमी सुनील बुर्गे हिला उत्तम, तर तात्यासाहेब मुसळे बाल विद्या मंदिरची कु. गार्गी चंद्रगुप्त घावरे हिला लक्षवेधी सादरीकरण पुरस्कार मिळाला.

                              समूह गटातील सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार कै. बाळकृष्ण सांगले विद्या मंदिरच्या कु. अक्षरा रोहन सुतार, कु. रिया स्वप्निल काळे, कु. सान्वी शिवाजी बेडेकर, कु. पूर्वी महेश मणिकरी, कु. आराध्या विकास ऐवळे, कु. स्वराली ओमकार आळंदे, कु. वीरा सतीश गुरव आणि कु. अनुष्का किशोर सिकंदर यांच्या समूहाने मिळविला.

सर्व विजेत्या बालकलाकारांचा प्रमाणपत्रे, वह्या व शालेय उपयोगी साहित्य देऊन गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभ कार्याध्यक्षा व सुप्रसिद्ध संगीत-नाट्य अभिनेत्री सौ. गौरी पाटील यांच्या हस्ते, अध्यक्ष मनीष आपटे, श्रीपाद कुलकर्णी, प्रा. मिलिंद दांडेकर व संजय सातपुते यांच्या उपस्थितीत पार पडला.

सौ. वैदेही भाटवडेकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शिक्षक व पालकांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष पुढाकार घेतला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.