पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व- मुलांची भेट घेऊन केले सांत्वन
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: कुपवाड येथील घटनेत मृत्यू झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले व त्यांना धीर दिला. दुःखाच्या या प्रसंगी शासन आणि प्रशासन मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे सांगून या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: घेणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, महानगरपालिका सभागृह नेते संदीप आवटी, उपमहापौर गजानन मगदूम, नगरसेवक विष्णू माने आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, केसरेकर दाम्पत्याच्या दोन्ही मुलांना आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात ठेऊन तेथील वसतिगृहाचा खर्चही करण्यात येईल. मुलांच्या शैक्षणिक व अन्य खर्चासाठी त्यांच्या बँक खात्यात तात्काळ एक लाख रुपये जमा करत असल्याचे सांगून यापुढेही आवश्यकतेप्रमाणे पैसे मुलांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असे सांगितले. त्याचबरोबर दोषींवर 15 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याशी चर्चा करून ही केस नियमितपणे चालवून लवकरात लवकर दोषीला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी महापालिका पदाधिकाऱ्यांनी सामुहिकरित्या केसरेकर दाम्पत्याच्या आर्थिक मदतीची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.