शहाजी महाविद्यालयात स्टडी कॉर्नरचे उद्घाटन; पर्यावरणपूरक रक्षाबंधनातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

कोल्हापूर: प्रवीण भोसले 

दि.२८: शहाजी महाविद्यालयातील विज्ञान विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन तसेच ‘ऑर्गानोव्हा’ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, विषयाची आवड, नाविन्यपूर्ण विचार तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम घेण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी गणितशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि रसायनशास्त्र विभागांच्या स्टडी कॉर्नरचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास अधिक सुलभ व रंजक पद्धतीने करता यावा, तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला व कल्पनाशक्तीला चालना मिळावी, हा उद्देश होता.

             यानंतर विविध विभागांच्या वतीने आकर्षक शैक्षणिक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. वनस्पतिशास्त्र विभागाने भित्तीपत्रके तसेच बियांच्या राख्यांचे प्रदर्शन भरविले. प्राणिशास्त्र विभागाने ‘Endocrine Gland’ या विषयावर माहितीपूर्ण प्रदर्शन सादर केले, तसेच क्ले आर्टचेही प्रदर्शन आयोजित केले.

          रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘ऑरगॅनो केम प्रॉडक्ट्स एक्झिबिशन’ आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सेंद्रिय व रासायनिक घटकांचा वापर करून हँड सॅनिटायझर, साबण, परफ्युम, फेसवॉश, मेहंदी, धूप आदी विविध उत्पादने स्वतः तयार केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उत्पादननिर्मितीबरोबरच उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू, शैक्षणिक साहित्य आणि विविध माहितीचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे सादरीकरण उल्लेखनीय व कौतुकास्पद ठरले.

        ‘पर्यावरणपूरक रक्षाबंधन’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी झाडाला पर्यावरणपूरक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. वृक्षांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. विज्ञानाधारित उपक्रम, स्टडी कॉर्नर, विविध शैक्षणिक प्रदर्शने आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

        कार्यक्रमास प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर, विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा. ए. व्ही. मगदूम-पाटील, विज्ञान विभागातील प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मानसिंग दादा बोंद्रे यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.

          विविध शैक्षणिक, वैज्ञानिक, सर्जनशील व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वनिर्मितीची प्रेरणा, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण झाली. उत्साहपूर्ण वातावरणात या उपक्रमांची सांगता झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.