पोलीस बांधवांसाठी ‘एक राखी पोलिसांसाठी’ उपक्रमातून रक्षाबंधनाचा आनंद
महिला दक्षता कमिटी, इनरव्हील क्लब, मारवाडी युवा मंच मिड टाउन व वीर महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२९ : समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावताना सण-उत्सवांपासून आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या मनगटावर प्रेमाची आणि आपुलकीची राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महिला दक्षता कमिटी, इनरव्हील क्लब, मारवाडी युवा मंच मिड टाउन व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक राखी पोलिसांसाठी’ हा भावनिक व सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून प्रेम, आपुलकी व विश्वासाचे नाते दृढ करते. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी सणासुदीच्या काळातही कर्तव्यावर तैनात असतात. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरे करता येत नाही. ही भावना लक्षात घेऊन पोलीस बांधवांनाही रक्षाबंधनाचा आनंद मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी महिला प्रतिनिधींनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला. राखी बांधताना उपस्थितांमध्ये आपुलकीचे व भावनिक वातावरण निर्माण झाले. पोलीस बांधवांनीही या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, गजेंद्र लोहार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पूनम माने, श्रीकृष्ण दरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे, महावीर कुटे, प्रवीण साने, गोविंद कोळेकर, अशोक चव्हाण यांच्यासह विविध पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका सपना भिसे, इनरव्हीलच्या मुग्धा शहा, मारवाडी युवा मंचच्या अनुराधा काबरा, वीर महिला मंडळाच्या प्रियांका बमन्नावर, महिला दक्षता कमिटीच्या वैशालीताई नाईकवडे, ललिता पुजारी, शुभांगी शिंत्रे, निर्मला मोरे, अनिता जैन, मेघा कांचनकुटी, वैशाली पोवार, मेघा खोत, बिस्मिला गैबान, सुषमा भिसे, पोलीस मित्र संघटनेच्या रजनी शिंदे, पोलीस मित्र गजानन शिरगांवे, अनिल बमन्नावर यांच्यासह महिला पदाधिकारी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पोलीस बांधवांच्या कर्तव्यनिष्ठेला व त्यागाला सलाम करणारा आणि समाज व पोलीस यांच्यातील स्नेहाचे नाते अधिक दृढ करणारा ‘एक राखी पोलिसांसाठी’ हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.