वाहतूक सुरक्षा ही काळाची गरज : मनोज ओतारी

शहाजी महाविद्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यशाळा

कोल्हापूर : प्रवीण भोसले 

दि.२९: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील क्रीडा विभाग व आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे व्हाईस चीफ पेट्रोन तथा चेअरमन मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास प्रोत्साहन लाभले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिमखाना विभागप्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन तसेच वाहन चालविताना घ्यावयाच्या आवश्यक काळजीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम गांभीर्याने पाळून स्वतःबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिले महाविद्यालय असल्याचेही त्यांनी सांगितले.

        सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि त्यासंदर्भातील विविध बाबींची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.

         महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांबाबत सजग राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्यामुळे होणाऱ्या विविध अपघातांच्या घटनांचा उल्लेख करून प्रत्येक विद्यार्थ्याने वाहतुकीचे नियम पाळावेत आणि रस्ता सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

        कार्यशाळेस आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, जिमखाना सदस्य डॉ. डी. पी. गावडे, ग्रंथपाल डॉ. पी. बी. पाटील, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एन. एस. जाधव यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रशांत मोटे यांनी केले, तर मराठी विभागप्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.