AI तंत्रज्ञानाची ‘कमाल’; रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय स्तरावर दखल!
‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची भारतातील प्रथम पाच अधिकाऱ्यांमध्ये निवड
रत्नागिरी :नियाझ खान
दि.२९ : अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत भारतातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS अॅपचे सादरीकरण सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA), हैदराबाद येथे करण्यात आले.
अज्ञात अथवा बेवारस मृतदेहांची ओळख पटविणे हे पोलिसांसमोरील अत्यंत आव्हानात्मक काम असते. अनेकदा मृतदेहांची अवस्था खराब झाल्याने चेहरा ओळखणे कठीण होते. अशा परिस्थितीत RAIDS अॅप पोलिसांसाठी प्रभावी तांत्रिक साधन ठरत आहे. या अॅपच्या माध्यमातून अज्ञात व बेवारस मृतदेहांची माहिती एकत्रित स्वरूपात संकलित केली जाते. उपलब्ध छायाचित्रे व इतर माहितीच्या आधारे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने चेहऱ्याची डिजिटल प्रतिकृती तयार केली जाते. त्यातून संभाव्य चेहरा पुनर्निर्मित करून संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्यास मदत होते.
विशेष म्हणजे, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी चेहऱ्याची १०८ विविध रूपे तयार करून तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची सुविधा या अॅपमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिक तपासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, पोलिसांच्या तपास प्रक्रियेला मोठी गती मिळत आहे.
१५३ बेवारस मृतदेहांची नोंद;१४ जणांची ओळख पटली
RAIDS अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत १५३ बेवारस मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ बेवारस व कुजलेल्या मृतदेहांच्या चेहऱ्यांची AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डिजिटल प्रतिकृती तयार करण्यात आली. यातील १४ प्रकरणांमध्ये मृतदेहांची यशस्वी ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
तर जिल्ह्याबाहेरील १९ बेवारस मृतदेहांपैकी 7 प्रकरणांमध्ये RAIDS अॅपच्या माध्यमातून ओळख पटविण्यात यश आले आहे. याशिवाय अॅपमध्ये तब्बल ३८१ बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ११ बेपत्ता व्यक्तींच्या चेहऱ्यांची डिजिटल प्रतिकृती तयार करून त्यांचा शोध घेण्यात यश आले आहे.
तंत्रज्ञानाधिष्ठित पोलिसिंगचा राष्ट्रीय गौरव
अज्ञात मृतदेहांची ओळख पटविण्यापासून ते बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यापर्यंत AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करणाऱ्या RAIDS अॅपने पोलिसिंगच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची ‘प्रधानमंत्री सिल्व्हर कप’ स्पर्धेत भारतातील प्रथम पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड होणे ही रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा तंत्रज्ञानाधारित उपक्रम केवळ तपासाला आधुनिक दिशा देणारा नसून, अज्ञात मृतदेहांना ओळख आणि बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांना आशेचा किरण देणारा ठरत आहे. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या या अभिनव कार्याचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.