एकाच दिवशी गणेश मिरवणुका काढण्याच्या निर्णयास शिवसेनेचा विरोध
आगमन व विसर्जन मिरवणुका वेगवेगळ्या दिवशी काढण्यास परवानगी द्यावी : जिल्हाप्रमुख संजय चौगुले
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२९: यंदाच्या गणेशोत्सवात सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन व विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश देण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे गणेश मंडळांच्या नियोजनासह वाहतूक व्यवस्था, स्वयंसेवकांची उपलब्धता आणि इतर व्यवस्थापनावर मोठा ताण येण्याची शक्यता असल्याने या निर्णयास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध दर्शविला आहे.सर्व मंडळांवर एकाच दिवशी मिरवणूक काढण्याची सक्ती न करता, पोलीस प्रशासनाच्या नियोजनानुसार ज्या मंडळांकडून आगमन किंवा विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगीचा अर्ज प्राप्त होईल, त्यांना उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या दिवशी मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केली आहे.
याबाबत बोलताना संजय चौगुले म्हणाले की, बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी यापूर्वीच नियोजन केले असून काही मंडळांनी वाद्यपथक, ढोल-ताशा पथक तसेच इतर व्यवस्थांसाठी आगाऊ बुकिंग केले आहे. ऐनवेळी प्रशासनाच्या निर्णयामुळे नियोजनात बदल करावा लागल्यास मंडळांसमोर अडचणी निर्माण होण्याबरोबरच गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघाल्यास वाहतूक नियंत्रण व कायदा-सुव्यवस्थेचा अतिरिक्त भार प्रशासनावर पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रशासनाने सर्व मंडळांना एकाच दिवशी मिरवणूक काढण्याची सक्ती करू नये. मंडळांनी केलेल्या अर्जानुसार पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून आगमन व विसर्जन मिरवणुकांसाठी स्वतंत्र दिवस निश्चित करावेत आणि त्यानुसार परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही संजय चौगुले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, नगरसेवक सयाजी चव्हाण, माजी शहरप्रमुख धनाजी मोरे, युवासेनेचे अभिजित लोले, सागर जाधव, रतन वाझे, संतोष लवटे, देवराज खोत, शुभम चौगुले यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक तसेच विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.