‘हे जीवन सुंदर आहे’ विषयावर शहाजी महाविद्यालयात विशेष व्याख्यान

कोल्हापूर :प्रविण भोसले 

दि.१ : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर समुपदेशक डॉ. माधवी सावंत यांचे विशेष व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. मानसिंग बोंद्रे दादा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. बी. बलुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून व्याख्यानाचा हेतू स्पष्ट केला.

        यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. माधवी सावंत यांनी तरुणांनी व विद्यार्थ्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करून आपल्या जीवनातील सकारात्मक बाबींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून चांगल्या व्यक्तींना आदर्श मानत जीवनाची वाटचाल करावी. आई-वडील आपल्या हितासाठीच अनेक गोष्टी सांगत असतात, त्यामुळे त्यांच्या अनुभवातून योग्य मार्गदर्शन घेऊन जीवन घडवावे, असे त्यांनी सांगितले.

          प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व तरुणांनी हट्टीपणा, अहंकार आणि ‘मीपणा’ कमी करून थोर व्यक्तींची चरित्रे वाचावीत. महात्मा गांधी यांच्यासारख्या महान व्यक्तींचे विचार आचरणात आणल्यास व्यक्तिमत्त्व विकासासोबतच जीवन अधिक समृद्ध होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी. पी. भाटे यांनी केले, तर आभार डॉ. डी. के. वळवी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मानसशास्त्र विभागाच्या ‘स्पंदन’ या भित्तीपत्रकाचे उद्घाटनही करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.