इचलकरंजी महापालिकेच्या पीएम ई-बस सेवेचा लोकार्पण सोहळा उद्या

इचलकरंजी :अन्वर मुल्ला

दि.१०:शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुलभ आणि पर्यावरणपूरक स्वरूप देणाऱ्या पी.एम. ई-बस सेवेचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पी.एम. ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोलगे मळा, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आला आहे.केंद्र शासन पुरस्कृत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुरू होणाऱ्या ई-बस सेवेचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. इचलकरंजी शहरातील नागरिकांना दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पी.एम. ई-बस सेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासही या सेवेचा हातभार लागणार आहे. आधुनिक ई-बसच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या लोकार्पण सोहळ्यास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इचलकरंजी प्रभारी महापौर अनिल डाळ्या यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.