सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर

सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजी महापालिकेचा उपक्रम

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि .४: सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी शहरातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या प्रयत्नातून आयोजित या शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांची रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, वजन यासह सर्वसाधारण शारीरिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या आरोग्यविषयक समस्यांबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला दिला.

          शहराची दैनंदिन स्वच्छता राखणे, कचरा संकलन करणे आणि स्वच्छतेशी संबंधित विविध कामे करताना सफाई कर्मचाऱ्यांना धूळ, कचरा तसेच विविध आरोग्यविषयक जोखमींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून या विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

                सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, संतुलित आहार घ्यावा तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधनांचा योग्य वापर करावा, याबाबतही आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

          यावेळी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेतल्या. शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या तपासणी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

            शहरातील आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिनल पडीया, डॉ. अनिता पाटील, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. वैभव साळे, डॉ. सॅमसन्स घाटगे, डॉ. मुदस्सर पटेल यांच्यासह परिचारिका, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.सेवा संकल्प अभियानातून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्यांना आवश्यक आरोग्य सेवा व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.