शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई; पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत
इलेक्ट्रिक मोपेड विक्रीच्या बहाण्याने चोरीचा प्रकार उघड; संशयित ताब्यात
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.20: मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली. इलेक्ट्रिक मोपेड विक्रीच्या बहाण्याने चोरीचा प्रकार उघडकीस आणत पोलिसांनी एकूण पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. यामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, दोन अॅक्टिव्हा आणि दोन टुनवाल इलेक्ट्रिक मोपेडचा समावेश असून, जप्त वाहनांची एकूण किंमत १ लाख १२ हजार रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
या प्रकरणी तनवीरउलहक अब्दुलहक अन्सारी (वय ३०, रा. रोशन मस्जिदमागे, जवाहरनगर, इचलकरंजी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील चार आणि इचलकरंजी पोलीस ठाण्यातील एका अशा एकूण पाच गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यामध्ये इचलकरंजी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२८/२०२६ चा समावेश असून, त्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये नोंद असल्याचे प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक चोरीच्या मोटारसायकलींच्या गुन्ह्यांचा तपास करीत होते. यावेळी पोलीस कर्मचारी सहाम सनदी आणि तुषार सूर्यवंशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निळ्या-पांढऱ्या रंगाचा आकाशी कॉलरचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती चोरीची टुनवाल कंपनीची इलेक्ट्रिक मोपेड विकण्यासाठी कबनूर ओढ्याजवळ येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. सकाळी सुमारे १०.१० वाजण्याच्या सुमारास संशयित व्यक्ती तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने इलेक्ट्रिक मोपेड चोरी केल्याची कबुली दिल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, इचलकरंजी शहरातून आणखी तीन मोपेड आणि एक मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत एक हिरो होंडा स्प्लेंडर, दोन अॅक्टिव्हा आणि दोन टुनवाल इलेक्ट्रिक मोपेड अशा एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, सहायक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर सूर्यवंशी, विकास चौगुले, किशोर कांबळे, सहाम सनदी, गणेश सनदी, तुषार सूर्यवंशी आणि राहुल कामत यांनी केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.