व्हेळ येथे विज्ञान शिबिर उत्साहात संपन्न

लांजा:  नियाझ खान 
दि. २४ :विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित व्हावी आणि दैनंदिन जीवनातील घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा व्हेळ नं. १ येथे ‘जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान’ या संकल्पनेअंतर्गत दोन दिवसीय विज्ञान शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या उपक्रमासाठी मुख्याध्यापक  संदीप मोरे,  शिक्षक रघुनाथ धावडे, विजय मोहिते तसेच स्वयंसेवक म्हणून  शुभ्रा शिगम यांचे सहकार्य लाभले. शिल्पा रेडीज (चिपळूण) आणि सुहास शिगम (व्हेळ, लांजा) व विज्ञान शिक्षिका श्रीमती शिंदे यांनी शिबिराच्या आयोजनात व मार्गदर्शनात सहभाग घेतला. 
       ‘खेळण्यातून विज्ञान, विज्ञानातून आनंद!’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान खेळणी स्वतः तयार केली. ‘उमलणारा कागदी हात’, ‘उमलणारा कागद’, ‘गरगणाऱ्या पिना’, ‘नाण्याची सर्कस’, ‘स्ट्रॉ स्प्रिंकलर’, ‘उडी मारणारी आगपेटी’ आणि ‘पेपर ग्लायडर’ यांसारख्या प्रयोगांनी शिबिरात उत्साह निर्माण केला.
       विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, यासाठी ‘तहानलेला कावळा’ या परिचित गोष्टीचे प्रयोगाद्वारे परीक्षण करण्यात आले. पाण्याची पातळी, पात्राचा आकार आणि त्यात टाकलेल्या दगडांचा होणारा परिणाम यांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी गोष्टीतील घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला.
      पुस्तकातील विज्ञान प्रत्यक्ष प्रयोगांतून समजून घेता येते, तसेच परिसरातील सहज उपलब्ध वस्तूंच्या माध्यमातूनही वैज्ञानिक विचारांना चालना देता येते, हा महत्त्वपूर्ण संदेश या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळाला. विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नव्हे, तर निरीक्षण, प्रयोग, प्रश्न आणि शोध यांचा आनंददायी प्रवास आहे, याची जाणीव करून देणारे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी अनुभवसमृद्ध आणि संस्मरणीय ठरले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.