माणगाव येथील स्वरा उपाध्ये हत्याकांडाचा सकल दिगंबर जैन समाजा इचलकरंजी यांच्या कडून तीव्र निषेध!

चिमुकलीच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्या; आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

इचलकरंजी : अन्वर मुल्ला 

दि.२४ : माणगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील अवघ्या १८ वर्षांच्या स्वरा उपाध्ये या अल्पवयीन मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेचा इचलकरंजी येथील सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

माणगाव येथे शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. एका निष्पाप मुलीचा अशा क्रूर पद्धतीने जीव घेतला जाणे ही केवळ एका कुटुंबावरील आपत्ती नसून संपूर्ण समाजमनाला हादरवून सोडणारी घटना आहे. या घटनेमुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्वरा उपाध्ये हिला न्याय मिळालाच पाहिजे, गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका सकल दिगंबर जैन समाजाने घेतली आहे. अशा प्रकारच्या अमानुष घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शासन व पोलीस प्रशासनाने कठोर आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास जलदगतीने व निष्पक्षपणे पूर्ण करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे न्यायालयात सादर करावेत. खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. तसेच शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक परिसरात मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
माणगाव ग्रामस्थांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणास सकल दिगंबर जैन समाजाचा जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. पीडित कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण जैन समाज सहभागी असून, स्वरा उपाध्ये हिला न्याय मिळेपर्यंत समाजाचा पाठिंबा कायम राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या घटनेचा निषेध करताना उपस्थित समाजबांधवांनी, “मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर आणि जलद न्याय होणे अत्यंत आवश्यक आहे. स्वरा उपाध्ये हिला न्याय मिळणे हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी सामूहिक भावना व्यक्त केली.

निवेदन देण्यासाठी सकल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष गुडाप्पाण्णा रोजे, भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संजय मगदूम, विजय गिरमल, उदय चौगुले, बाबासो हुपरे, अनिल बम्मन्नावर, सुनील भोने, सुकुमार पोते, अशोक मगदूम, भीमागोंडा पाटील, रमेश सिद्धनाळे, बाहुबली पाटील, नरेंद्र केटकळे, बापूसाहेब संखाना, अनंत बोरगावे, विशाल बम्मन्नावर, दयानंद काने, मोहन बोरगावे, संतोष रायनाडे आदी मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वरा उपाध्ये हत्याकांडातील दोषीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि समाजातील प्रत्येक मुलगी निर्भयपणे जगू शकेल असे सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, हीच सकल दिगंबर जैन समाजाची एकमुखी मागणी असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.