गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष!
कोल्हापूर रोडवरील भाग्यरेखा टाकी परिसरातील नागरिक हैराण; अप्सरा मटन शॉपसमोर अस्वच्छतेचे साम्राज्य
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि .१९:शहरातील स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या पालिका प्रशासनाला कोल्हापूर रोडवरील भाग्यरेखा टाकीसमोरील अस्वच्छतेचे चित्र दिसत नाही का? भाग्यरेखा टाकीसमोरील अप्सरा मटन शॉप दुकानासमोरून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याने या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.गटारीचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने या मार्गावरून ये-जा करणारे नागरिक, वाहनधारक तसेच परिसरातील व्यावसायिक दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचणारे आणि वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असून नागरिकांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

विशेष म्हणजे या परिसरात विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत. ग्राहकांना दुकानात येताना अशा दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावरही विपरीत परिणाम होत आहे. वाहनधारकांना या सांडपाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
शहरात स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले जात असताना मुख्य रस्त्यालगतच गटारीचे पाणी वाहत असेल, तर या स्वच्छता मोहिमेचा उपयोग नेमका कोणासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाही संबंधित विभागाकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालिका प्रशासनाने आणखी किती दिवस नागरिकांची गैरसोय होण्याची वाट पाहायची? गटारीची तातडीने स्वच्छता करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा आणि रस्त्यावर वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे.आता तरी पालिका प्रशासनाने जागे होऊन या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अन्यथा स्वच्छतेच्या दाव्यांचा बुरखा प्रत्यक्ष परिस्थितीसमोर फाटल्याशिवाय राहणार नाही!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.