AI तंत्रज्ञानाचा पोलिस तपासात प्रभावी वापर!

कवटीच्या रचनेवरून चेहऱ्याची प्रतिमा तयार; अनोळखी मृतदेहाची ओळख पटली रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS App मुळे परभणीतील खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा

रत्नागिरी :नियाझ खान 

दि.२०:आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे तपासाला नवी दिशा देण्याचा अभिनव प्रयोग रत्नागिरी पोलीस दलाने यशस्वी केला आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या AI आधारित RAIDS App च्या मदतीने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर खून प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. या तांत्रिक मदतीमुळे खून प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.


दि. ९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांना रत्नागिरी पोलीस दलाच्या AI आधारित RAIDS App ची मदत घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ॲपच्या माध्यमातून मृतदेहाच्या कवटीच्या रचनेचा आधार घेत AI तंत्रज्ञानाद्वारे चेहऱ्याची प्रतिमा पुनर्रचित (Face Reconstruction) करण्यात आली. तयार करण्यात आलेले छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटलांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.


या तांत्रिक प्रक्रियेला यश मिळाले असून, मृत व्यक्तीची ओळख गिताराम प्रकाश मुजमुले, रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी अशी पटली. पुढील तपासात या खून प्रकरणी मृत व्यक्तीचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोघांना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पारंपरिक तपास पद्धतीसोबतच आधुनिक AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठी मदत होऊ शकते, हे या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे. रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या RAIDS App मुळे केवळ अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यास मदत झाली नाही, तर दुसऱ्या जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्याच्या तपासालाही महत्त्वपूर्ण हातभार लागला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.