कै. नाना सिंहासने यांच्या २६ वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश; सांगलीत राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

प्रथमच राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडणार; राज्यभरातील ४०० खेळाडूंचा सहभाग

सांगली :मयुरी देशपांडे

दि.२२ :वेटलिफ्टिंग खेळाच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे आदरणीय गुरुवर्य कै. किरण उर्फ नाना सिंहासने यांच्या स्मरणार्थ पहिल्या १२ व १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या कॅडेट राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा तसेच २१ व्या युथ राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन दि. २० ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कल्पतरू मंगल कार्यालय, सांगली येथे करण्यात आले आहे. अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशन, ठाणे यांच्या आयोजनातून, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना व सांगली जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा पार पडत आहेत.

कै. नाना सिंहासने यांनी गेली २६ वर्षे वेटलिफ्टिंग खेळाच्या प्रसारासाठी आणि नवोदित खेळाडू घडविण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचे हे फलित आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून साकारलेल्या या स्पर्धेला यंदा ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, प्रथमच राष्ट्रीय कॅडेट वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. कै. नाना सिंहासने यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याने ही स्पर्धा त्यांच्या स्मृतींना वाहिलेली अनोखी आदरांजली ठरत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सौ. पूजा विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. सुधीर म्हाळसकर, कार्यवाहक श्री. प्रशांत बेंद्रे, वरिष्ठ पंच व ठाणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिल माहुली, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी श्री. प्रदीप पाटील, शिवछत्रपती पुरस्कारार्थी श्री. अमित नलावडे, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे वरिष्ठ सल्लागार व कै. नाना सिंहासने यांचे स्नेही श्री. बिहारीलाल दुबे, श्री. राहुल सिंहासने, श्री. विनायक जोशी , मीरा सिंहासने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. सुहास व्हटकर यांनी केले.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले असून, ५० संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक उपस्थित आहेत. याशिवाय पंच, तांत्रिक अधिकारी आणि अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशनचे स्वयंसेवक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. अल्पवयीन खेळाडूंना राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील गुणवत्ता विकसित करणे आणि भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे वेटलिफ्टर घडविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

विशेष म्हणजे, अत्यंत कमी कालावधीत म्हणजे अवघ्या दहा दिवसांच्या नियोजनातून एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशनचे सचिव श्री. दत्तात्रय विठ्ठल टोळे, जे कै. नाना सिंहासने यांचे जावई आहेत, तसेच सौ. मधुरा सिंहासने टोळे आणि फाउंडेशनची १० ते २५ वयोगटातील युवा स्वयंसेवकांची टीम गेल्या दहा दिवसांपासून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. नियोजन, व्यवस्थापन, खेळाडूंची व्यवस्था आणि विविध जबाबदाऱ्या युवा स्वयंसेवकांनी उत्साहाने स्वीकारल्या आहेत.

कै. नाना सिंहासने यांच्या २६ वर्षांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारी ही स्पर्धा केवळ एक क्रीडा आयोजन नसून, त्यांच्या स्वप्नांना आणि वेटलिफ्टिंग खेळाप्रती असलेल्या समर्पणाला दिलेली मानवंदना आहे. सांगलीच्या क्रीडा इतिहासात या स्पर्धेची निश्चितच महत्त्वपूर्ण नोंद होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.