२६/११ च्या शहीदांना मानवंदना देण्यासाठी सांगलीतून ‘शहीद दौड’ला प्रारंभ!

१२ धावपटू सहा दिवसांत पार करणार ४७० किलोमीटरचे अंतर; गेटवे ऑफ इंडिया येथे दौडची सांगता पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि शहीद इंटरनॅशनलचे चेअरमन समित (दादा) कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडचा शुभारंभ

सांगली :मयुर देशपांडे 

दि.२२ : मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई अशा ४७० किलोमीटरच्या ‘शहीद दौड’ला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि शहीद इंटरनॅशनलचे चेअरमन समित (दादा) कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या दौडचा शुभारंभ करण्यात आला.शहीद इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यंदा २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सांगली ते मुंबई अशी शहीद दौड आयोजित करण्यात आली आहे. या दौडमध्ये १२ धावपटू हातात मशाल आणि भारतीय तिरंगा घेऊन शहीदांना मानवंदना देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

          २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांसह सुरक्षा दलाच्या जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत दहशतवाद्यांचा सामना केला. देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लढलेल्या या वीरांच्या बलिदानाची आठवण नव्या पिढीला करून देणे, त्यांचा आदर्श तरुणांसमोर ठेवणे आणि समाजात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे हा या दौडचा मुख्य उद्देश आहे.

सांगली येथून सुरू झालेली ही दौड तासगाव, विटा, पुसेसावळी, रहिमतपूर, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई, चेंबूर आणि माटुंगा मार्गे मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचणार आहे. सहा दिवसांच्या या प्रवासात धावपटू सुमारे ४७० किलोमीटरचे अंतर पार करणार आहेत.या दौडमध्ये पंढरीनाथ मारुती वडर, सुशांत बंडू मोरे, प्रसाद निवृत्ती कारंडे, आयुष कुमार चोरमले, आदर्श अजित अकिवाटे, जय अनिल महापुरे, सक्षम कुमार हिरवे, आर्यन मारुती मोरे, स्वप्नील माने, आदित्य लोखंडे, जयदीप घारगे आणि प्रतीक नलवडे या १२ धावपटूंचा सहभाग आहे.

यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील (जत), मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, डॉ. रियाज मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत कुंभार, योगेश रोकडे, घनश्याम उके, संभाजी लोखंडे, ललित छाजेड, इनायत तेरदाळकर, देवदास चव्हाण, पै. अभिजीत पाटील, संतोष जाधव, निलेश मिसाळ, अभिजीत भोईटे, सचिन खोंद्रे, दिलीप रोकडे, नाना शिंदे, स्वप्नील माने, जयदीप घारगे, आदित्य लोखंडे, प्रतीक नलवडे, नितीन कदम, सुधीर भगत, अमित सोनवणे आणि हिना पठाण परिश्रम घेत आहेत.

शहीदांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी सुरू झालेली ही दौड केवळ धावण्याचा उपक्रम नसून, राष्ट्रभक्ती, शौर्य, त्याग आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.