नव कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
२६ व २७ नोव्हेंबरला आयोजन; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला मिळणार हक्काचे व्यासपीठ
सांगली : मयुरी देशपांडे
दि. २५ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नवोपक्रमांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने नव कृष्णा व्हॅली स्कूल, कुपवाड येथे ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती मिरज शिक्षण विभाग आणि मिरज तालुका विज्ञान-गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि. २६) आणि शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी हे प्रदर्शन पार पडणार आहे.या प्रदर्शनात मिरज तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी आपापल्या वैज्ञानिक प्रतिकृती, प्रयोग, उपकरणे आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देतानाच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची प्रेरणा या प्रदर्शनातून मिळणार आहे.

गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प्रदर्शनातील उपकरणांची मांडणी करण्यात येईल. त्यानंतर उद्घाटन समारंभ होणार असून, दुपारी २ ते ४ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. शुक्रवारी, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विविध वैज्ञानिक उपकरणांचे परीक्षण करण्यात येणार असून, दुपारी ३ नंतर पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती मिरजच्या सभापती सौ. राणी भोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी उपसभापती सौ. ललिता शेजुळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच गटविकास अधिकारी किरण सायमोते, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, गटशिक्षणाधिकारी रियाजअहमद शेख, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी धडस, विजयकुमार पाटील आणि प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर यांच्यासह पंचायत समिती व शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी नव कृष्णा व्हॅली स्कूलचे अध्यक्ष प्रवीणशेठ सुरजमल लुंकड आणि सचिव श्रीशैल मोटगी यांचे सहकार्य लाभत आहे. मिरज तालुका विज्ञान-गणित अध्यापक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षकवर्ग प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलतेचा आविष्कार अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.