मिशन फिनिक्सअंतर्गत चिपळुणात गांजाची शेती उद्ध्वस्त!

पटेल सॉ मिलच्या आवारात छापा; १ लाख ३८ हजार ३०० रुपयांची ५.५३२ किलो गांजाची झाडे जप्त, २० वर्षीय तरुण ताब्यात

चिपळूण : सचिन पाटोळे 

दि.२६ : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळुणात मोठी कारवाई केली. पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात विनापरवाना गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत ५ किलो ५३२ ग्रॅम वजनाची, तब्बल १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पिंपळी खुर्द, ता. चिपळूण येथील पटेल सॉ मिलच्या आवारात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने एनडीपीएस कायद्याच्या अनुषंगाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणाऱ्या अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, ता. मिल्कीपूर, जि. अयोध्या, उत्तर प्रदेश) याच्याकडून गांजाच्या झाडांची विनापरवाना लागवड व जोपासना होत असल्याचे निदर्शनास आले.

पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी गांजाची एकूण ५.५३२ किलो वजनाची झाडे जप्त केली. त्यांची बाजारभावानुसार किंमत १ लाख ३८ हजार ३०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा (कॅनॅबिस) वनस्पतींची लागवड केल्याप्रकरणी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी चिपळूण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ठेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोडकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नाडेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांचा समावेश होता.जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने ‘मिशन फिनिक्स’अंतर्गत पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.