कुणबी समाजाच्या प्रगतीसाठी नव्या नेतृत्वाला संधी द्या; जुन्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज

सामाजिक कार्यकर्ते शेखर बाबू जोगळे यांचे परखड मत

देवरुख :सचिन पाटोळे 

दि.25: कुणबी समाजाची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी आता नेतृत्वात बदल घडवून आणण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे समाजकारण आणि राजकारणातील पदांवर कार्यरत असलेल्या जुन्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करून नव्या पिढीतील तरुणांना नेतृत्वाची संधी द्यावी, असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. शेखर बाबू जोगळे (देवरुख) यांनी व्यक्त केले आहे.कुणबी समाजातील तरुण आज उच्चशिक्षित असून तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करत आहेत. समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छाशक्ती असूनही त्यांना निर्णय प्रक्रियेत पुरेसे स्थान मिळत नसल्याची खंत जोगळे यांनी व्यक्त केली.

समाजाच्या बैठका, मेळावे आणि विविध कार्यक्रमांमध्ये तरुणांचा वापर केवळ नियोजन, बॅनर लावणे, व्यवस्था पाहणे आणि इतर कामांसाठी केला जातो. मात्र, नेतृत्वाची जबाबदारी किंवा महत्त्वाची पदे देण्याची वेळ येते, तेव्हा अनुभवाचे कारण पुढे करून त्यांना संधी नाकारली जाते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जुन्या नेतृत्वाने मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारावी

नवीन पिढी पुढे आल्यास आपले महत्त्व कमी होईल, या मानसिकतेतून तरुणांना दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना समाजात निर्माण होत आहे. बदलत्या काळानुसार नवीन विचार, आधुनिक दृष्टिकोन आणि तरुणांची कार्यक्षमता स्वीकारली नाही, तर समाजाच्या प्रगतीचा वेग मंदावेल, असेही जोगळे यांनी म्हटले आहे.

तरुण समाज संघटनांपासून दूर जाणे चिंताजनक

समाजाच्या संघटनांमध्ये योग्य संधी आणि सन्मान मिळत नसल्याची भावना निर्माण झाल्याने अनेक तरुण इतर राजकीय पक्ष व संघटनांकडे वळत आहेत. ही बाब कुणबी समाजाच्या संघटनात्मक आणि बौद्धिक ताकदीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. समाजातील तरुणांची ऊर्जा आणि क्षमता समाजाच्या विकासासाठीच उपयोगात आली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तरुणांच्या हातात नेतृत्वाची सूत्रे देण्याची वेळ

ज्येष्ठांनी आपला अनुभव आणि मार्गदर्शन नव्या पिढीला द्यावे, तरुणांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे आणि त्यांच्यावर विश्वास दाखवावा. पदांचा मोह बाजूला ठेवून नव्या नेतृत्वाला संधी दिल्यासच कुणबी समाजाची राजकीय, सामाजिक व आर्थिक वाटचाल अधिक सक्षम होईल.

समाजाची एकजूट टिकवायची असेल आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जायचे असेल, तर जुन्या नेतृत्वाने मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारून तरुणांना नेतृत्वाची संधी देणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शेखर बाबू जोगळे यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.