संविधानाचा सन्मान राखण्याचे काम भाजपकडूनच – खासदार धनंजय महाडिक
शहाजी लॉ कॉलेजमध्ये संविधान गौरव दिन; विद्यार्थ्यांना संविधान प्रतींचे वाटप
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि .२७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानात काँग्रेसने १०६ वेळा बदल केले. मात्र, भाजप संविधान बदलणार असल्याची अफवा देशभर पसरविण्यात आली. प्रत्यक्षात भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाचा सन्मान राखण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान आणि कौन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या पुढाकारातून शहाजी लॉ कॉलेज येथे आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी खासदार महाडिक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

यावेळी महाडिक यांनी महू येथील डॉ. आंबेडकर यांचे जन्मस्थळ, लंडनमधील निवासस्थान, नागपूरची दीक्षाभूमी आणि दिल्लीतील स्मारकांच्या विकासकामांचा उल्लेख केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिष्ठा मिळवून दिल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. भविष्यात ते आयएएस, आयपीएस, डॉक्टर, अभियंते, वकील यांसह विविध क्षेत्रांत महत्त्वाची पदे भूषविणार आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान देशाला प्रगतीच्या उंचीवर नेणारे आहे. यावेळी खासदार महाडिक यांच्या हस्ते काही विद्यार्थिनींना संविधानाच्या प्रतींचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
प्रा. मधुकर पाटील यांनी लोकशाही बळकट ठेवण्यासाठी संविधानाचे महत्त्व विशद केले, तर प्रा. सविता रासम यांनी नव्या पिढीत लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी प्रा. प्रज्ञा गिरी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विभावरी मोहिते, आफसा खान, ऋचा वारके आणि पूर्वा जांभळे या गुणवंत विद्यार्थिनींचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. लहुकुमार थोरात, प्रा. मधुकर पाटील, प्रा. सविता रासम यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.