कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.15: ‘सर्वांना घरे’ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा एकत्रित आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील झोपडपट्टी धारकांना सातबारा देणे, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे बांधून देण्याविषयी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, तहसीलदार सुनीता नेर्लीकर, महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तसेच बांधकाम, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूरातील राजेंद्रनगर, कसबा बावड्यातील मातंग वसाहत, संकपाळ नगर, दत्त मंदिर जवळील झोपडपट्टी, शिये पाणंद उलपे माळ, शुगर पाणंद (गोळीबार मैदान) तसेच शहरातील इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषाप्रमाणे पुनर्वसन करण्याबाबत पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी चर्चा केली. शहरातील सामान्य माणसांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेतून पक्की घरे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील झोपडपट्ट्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे, यासाठी लागू नियमांमध्ये शिथिलता मिळण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्री व नगररचना विभागाच्या संचालकांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शहरातील झोपडपट्टी धारकांना ‘हक्काचे घर’ बांधून देण्याच्या दृष्टीने पुररेषा व अन्य बाबींचा विचार करुन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुषंगाने विविध विषयांवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी अधिकारी व असोसिएशनच्या सदस्यांसोबत चर्चा केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.