कडवई तुरळ रिक्षा चालक मालक संघाकडून ठिय्या आंदोलन

कडवई:-
संगमेश्वर तालुक्यातील रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्या वतीने सोमवार दिनांक ४ एप्रिल पासून उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उप विभाग देवरुख यांचे कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आवाज दिल्याने सोमवार पासून कडवई तुरळ चिखली विभागातील सर्वच्या सर्व रिक्षावाहतुक ही बेमुदत बंद रहाणार असून प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयबद्दल रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे . हे आंदोलन जनहितासाठी असल्याने सर्व ग्रामस्थानी सहकार्य करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .
कडवई तुरळ हा सण २०२० मध्ये ठेकेदाराने केलेला रस्ता हा काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच खराब व्हायला सुरुवात झाल्याने रिक्षा संघटनेच्या वतीने याविरोधात अनेकवेळा आवाज उठवला व उपोषणासारखी आंदोलने केली . या रस्त्याचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नसून , निकृष्ठ झाले असतानाही मंजुरीपेक्षा जास्त रक्कम ठेकेदाराला अदा झाली असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे . यातील अनेक कामेही झालेली नाहीत .
यावर कळस म्हणजे याचा दोष व दायित्व कालावधी पूर्ण झालेला नसताना हा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे . यावर गेली वर्षभर रिक्षा संघटनेचा तीव्र लढा सुरू असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारालाच पाठिशी घालत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे .बांधकाम अधिकाऱ्यावर राजकीय दबाव असल्याने हे अधिकारी दहशतीखाली कारवाई करण्यास धजत नसल्याचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण याचे म्हणणे आहे.
अखेर रिक्षा संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक ४ एप्रिल पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख येथील कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . जोपर्यंत संबंधीत ठेकेदार व बांधकामाचे अधिकारी यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्या मुजोर ठेकेदारास काळ्या यादीत टाकले जात नाही व रस्ता दुरुस्तीची हमी दिली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू रहाणार असून या कालावधीत कडवई तुरळ चिखली स्टँडच्या सर्व रिक्षा बंद रहाणार असल्याचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी सांगितले . यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असून याबद्दल संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे .तसेच या जन हितासाठी पुकारलेल्या या आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.