डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने मिळावा

आ. प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्यावतीने फडणवीस यांना निवेदन

इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १२ एप्रिल हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगांव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने मिळावा. त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारकाचा उद्घाटन सोहळा महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते व्हावा, अशा मागणीचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले.
या संदर्भात माहिती देताना आमदार आवाडे म्हणाले, महामानव डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे जगातील सर्वोत्तम लोकशाही भारतात प्रस्थापित झाली. 21 व 22 मार्च 1920 रोजी माणगांव येथे ऐतिहासिक पहिल्या बहिष्कृत वर्गाची परिषद झाली होती. राजर्षि छत्रपती शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेला 102 वर्षे झाली आहेत. या ऐतिहासिक स्मारकाचा 169 कोटींचा आराखडा तयार केला असून त्यापैकी सुरूवातीच्या 2 कोटी 38 लाखांच्या लंडन हाऊस प्रतिकृती, ऐतिहासिक तक्क्या इमारत आणि हॉलोग्राफीक शो व स्वागत कमानीचे लोकार्पण लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार होते. पण कोरानामुळे तो कार्यक्रम शासनाला रद्द करावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासन निर्बंध हटले आहेत. त्यामुळे स्मारकासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा. त्याचबरोबर डॉ. आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास राष्ट्रपतींनी उपस्थित रहावे त्याचबरोबर स्मारकासाठीचा निधी तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस यांनी उद्घाटन समारंभास राष्ट्रपती निश्‍चित येतील अशी ग्वाही दिली.
यावेळी मुरलीधर कांबळे, नंदकुमार शिंगे, बाबासो कांबळे, भिकाजी शिंगे, नितीन गवळी, रवी सनदी, सिध्दार्थ मोहिते, योगेश सनदी, आकाश शिंगे, अक्षय डोणे, अक्षय बिरांजे, जिन्ना बिरांजे आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.