लढाऊ विमानामुळे पडणार देवरुखच्या लौकिकात भर,शहीद जवान स्मारकासाठी लढाऊ विमान मंजूर

 संगमेश्वर:(नियाझ खान)

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या शहीद जवान स्मारकासाठी HPT-32 प्रकाराचे लढाऊ विमान मंजूर झाले आहे. यासंबंधीचे पत्र रक्षामंत्रालयाकडून शुक्रवार दिनांक २२ जुलै रोजी प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली आहे.यामुळे टीव्ही,मोबाईल मध्ये दिसणारे युद्धातिल लढाऊ विमान देवरूखसह तालुका वासीयांना जवळून पाहता येणार आहे. या विमानाच्या आगमनामुळे  देवरुख शहराच्या लौकिकात भर पडणार आहे.देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ सामाजिक बांधिलकीने काम करत आहे.देशाप्रती,जवानांप्रति आदर निर्माण व्हावा,येथील तरुणांना देश सेवेसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने शहीद जवान स्मारक उभारण्यात आले आहे.हे स्मारक लक्षवेधी ठरत आहे.हे स्मारक पाहण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी अनेकजण भेट देतात.शहीद जवान स्मारकामध्ये टी-५५ जातीचा रणगाडा,जिपवर माउंट केलेली RCLगन,INS दिल्ली लढाऊ नौकेची प्रतिकृती असून यामध्ये आता लढाऊ विमानाची भर पाडणार आहे.संस्थेसाठी ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

      लढाऊ विमान मंजूर झाल्याने श्री.भागवत यांनी रक्षामंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,एअरमार्शल  हेमंत भागवत आणि शहीद स्मारकाचे आधारस्तंभ मदन मोडक यांचे विशेष आभार मानले आहेत.लढाऊ विमान स्मारकासाठी मिळावे यासाठी गेली चार वर्षे पाठपुरावा सुरू होता.लढाऊ विमान मंजूर झाल्याने गेल्या चार वर्षांचे प्रयत्न फळाला आल्याचे श्री. भागवत यांनी नमूद केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.