कडवई ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेला चांगली उपस्थिती
आरवली:— (सचिन पाटोले)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायात कार्यालयात पार पडली या सभेला जवळजवळ १२० ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी बी के भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.ही ग्रामसभा गावाच्या विकासाच्या प्रश्नावरुन चांगलीच वाजली.या ग्रामसभेत कडवई प्राथमिक आरोग्य केंद्राचा सावळागोंधळ,विजवीतरण कम्पनी चा ढिसाळ कारभार ,रेशन दुकानदारांची मनमानी व कडवई तुरळ रस्त्याच्या कामात झालेला अनियमितपणा या विषयावर ग्रामस्थानी जोरदार आवाज उठवला . तर वेळोवेळी सूचना देऊनही ग्रामसभेला अनुपस्थित रहाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जाहीर निषेध तसेच कडवई तुरळ रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव या ग्रामसभेत करण्यात आला.
कडवई ग्रामपंचायतीची १५ ऑगस्ट ची तहकूब ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली.या ग्रामसभेत अनेक वादग्रस्त विषयावर चर्चा होणार असल्याची हवा झाल्याने ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.याच ग्रामसभेत कडवई गावच्या तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली.तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मुझफ्फर खान यांची नियुक्ती करण्यात आली.सभेच्या सुरवतीपासूनचं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले.ग्रामस्थानी अनेक वादग्रस्त विषयाला हात घातला.
कडवई बाजारपेठेतील वाढीव बांधकामाचा नेहमीप्रमाणे पुढे आला यावेळी ग्रामपंचायतिच्या वतीने सदरचे बांधकाम ज्या जिल्हापरिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे त्यांचेकडून मार्गदर्शन मागविले असता ग्रामपंचायतीवर जबाबदारी टाकून हात झटकले जात असल्याचे सांगण्यात आले.कडवई मधील रेशन दुकानदारांच्या मनमानी चा विषय ही प्रामुख्याने घेण्यात आला.याबाबत तहसीलदार यांचेकडे तक्रार करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाकडून रुग्णवाहिकेच्या वापरासाठी अवाजवी पैसे घेतले जात असल्याची बाब ग्रामपंचायत सदस्य गौरी भिंगार्डे यांनी समोर आणली.तसेच रुग्णाकडून उपचाराचे पैसे घेतले जात असल्याचेही ग्रामस्थानी उघड केले.याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई होण्यासाठी पाऊल उचलले जाईल अशी ग्वाही सरपंच कुवळेकर यांनी दिली.याच आरोग्य केंद्रात अनधिकृत रित्या चालवले जाणारे उपहारगृह योग्य निविदा प्रक्रिया करुन स्थानिकांना मिळावे अशी मागणीही करण्यात आली.तर या रुग्णवाहिकेच्या खाजगी कामासाठी वापर होत असून याचीही चौकशी व्हावी व गरजुना ही रुग्णवाहिका मोफत मिळावी अशी मागणी ग्रामस्थानी केली.
कडवई तुरळ रस्त्याचे सण २०२० साली झालेले काम हे निकृष्ठ झाले असून काम पूर्ण झाल्यानंतर दोनच महिन्यात हा रस्ता उखडला गेला.त्यानंतर रिक्षा संघटनेने अनेक आंदोलने केली व ग्रामपंचायतीच्या वतीनेही सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत कल्पना देण्यात आली.यानंतर मे महिन्यामध्ये या रस्त्याचे खड्डे भरण्यात आले मात्र पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची पुन्हा दुरावस्था झाली आहे.त्यामुळे सदरचे निकृष्ठ काम करून कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे असा एकमुखी ठराव करण्यात आला.वारंवार कल्पना देऊनही ग्रामसभेला अनुपस्थित रहाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या निषेधाचा ठराव ही या सभेत करण्यात आला.रेशन दुकानाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे ग्राहकांना मारावे लागणारे हेलपाटे व रेशन दुकानदारांची मनमानी याबाबतही आवाज उठवण्यात आला.अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्याने ही ग्रामसभा वादळी ठरली.
या सभेत ग्रामविकास अधिकारी बी के भुसारी यांनी शासनाच्या विविध योजना तसेच परिपत्रकाची माहिती ग्रामस्थाना दिली.उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामाबाबत माहिती दिली.या ग्रामसभेत तंटामुक्त समितीची निवड करण्यात आली.तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नागरिक मुझफ्फर खान यांची निवड करण्यात आली.गाव तंटामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.जीवनविद्यामिशनच्या वतीने कडवई गाव दत्तक घेण्याबाबत ग्रामस्थानी एकमुखी समतीचा ठराव केला.अशा विविध विषयांवर ही ग्रामसभा चांगलीच वाजली.या ग्रामसभेला सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी,गावांतील विविध पक्षाचे पदाधिकारी,व गावातील नागरिक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.