“शरद कृषी” च्या १८ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड
जैनापुर, : राम आवळे
दि 30 : जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांची कृषी व संलग्न विषयांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे . महाविद्यालयाने आपल्या या यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा राज्यात ‘शरद पॅटर्न’ यशस्वी ठरवला आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात ९, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात २, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ १, तसेच इतर कृषी व संलग्न विद्यापीठांमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयाने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट निर्माण करून शिक्षणाबरोबर इतर वेळेमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सर्व शिक्षक वर्गाने शरद पॅटर्न राबवत नियोजनबद्ध पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. त्यामुळे पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली. पदव्युत्तर शिक्षणासाठी स्नेहल माळी, ऋतिका पाटील, वेदिका आलमाने, रोहित हराळे, हर्षल अडसोळे, हरिशा मायगोंडा-पाटील, तेजस पाटील, प्रगती पडवळ, साक्षी चौगुले, तेजस्विनी खोले, साहिल पाटील, श्रावणी शिंदे, इंद्रायणी लाड, अभिषेक गोरे, यशराज तावरे, रोहन पाटील, वैभव तुरे आणि प्रतीक बडदे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थी व प्राध्यापकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.एस. आर. कोळी, उपप्राचार्य प्रा. एस. एच. फलके, पदव्युत्तर शिक्षण तयारी समन्वयक प्रा. आर. एम. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.