मेधाताई पाटकर, विलासराव शिंदे आणि स्वप्निल कुसळे यांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील पुरस्कार
शिरोळ: कयुम शेख
दि .१७: येथे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी विलासराव शिंदे, तर प्रेरणा पुरस्कार ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषेदेत गौरव समितीच्या वतीने देण्यात आली.

हा पुरस्कार समारंभ मंगळवार, १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता कै. दत्ताजीराव कदम क्रीडांगण, दत्तनगर, शिरोळ येथे संपन्न होणार असून, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारांची परंपरा आणि मान्यता
स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी सहकार, कृषी आणि समाजकार्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून २०१५ पासून या पुरस्कारांना सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, शरद पवार, डॉ. डी. वाय. पाटील, मिरा बोरवणकर, डॉ. राजेंद्रसिंह राणा यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार विजेत्यांचे योगदान
मेधाताई पाटकर – नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून समाजासाठी लढणाऱ्या आणि पर्यावरण-संवर्धनाचे भान जपणाऱ्या मेधाताई पाटकर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विलासराव शिंदे – नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून नावाजले गेलेले विलासराव शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या माध्यमातून शेतीला चालना दिली आहे.
स्वप्निल कुसळे – कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव वाढवणारा हा खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेता असून, त्याच्या अथक मेहनतीचा सन्मान प्रेरणा पुरस्काराने केला जाणार आहे.
शिरोळ तालुक्याच्या सहकार आणि कृषी विकासाचा वारसा जपणारे हे पुरस्कार समाजातील आदर्श व्यक्तींच्या कार्याला नवा सन्मान देत आहेत. हा गौरव सोहळा प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.