ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे : डॉ. जी. डी. यादव
संजय घोडावत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत सोहळा संपन्न
अतिग्रे –संतोष कांबळे
दि.४ :पारंपारिक ऊर्जा स्त्रोत 2050 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता असल्याने जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाला मोठी संधी असून, तरुण वैज्ञानिकांनी या क्षेत्रात अधिक संशोधन करावे, असे मत नॅशनल सायन्स चेअर (भारत सरकार) आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केले.
संजय घोडावत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यांनी पर्यावरणीय बदल, जागतिक तापमान वाढ, नवीन ऊर्जा स्रोत, कार्बन उत्सर्जन आणि ऊर्जा क्षेत्रातील संशोधनाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल इंटर्नशिप अनिवार्य करण्याची व त्यासाठी पाच हजार रुपयांचे स्टायपेंड देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच मुलींसाठी शिक्षण विनामूल्य असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पवनचक्की क्षेत्रात घोडावत ग्रुपच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा
कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले यांनी वार्षिक अहवाल सादर करत विद्यापीठाने सुरू केलेले नवे उपक्रम आणि मिळवलेली यशस्वीता याबाबत माहिती दिली. आगामी योजनांचा आढावा घेताना त्यांनी संशोधन आणि तांत्रिक शिक्षणाच्या विकासावर भर दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अपयशाने खचून न जाता शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. त्यांनी प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचा सल्ला दिला.
९०८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
यावेळी९०८ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच आचार्य १०८ श्री विशुद्ध सागर जी महाराज मुंबईत असल्यामुळे त्यांना देण्यात येणारी डी.लीट पदवी त्यांच्या कार्यक्रम स्थळी जाऊन देण्यात येणार असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील यांनी सांगितले.
दीक्षांत सोहळ्यासाठी गव्हर्निंग बॉडी सदस्य डॉ. बी. एम. हिर्डेकर, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, सर्व डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पाटील आणि अर्जुन पाटील यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.