पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ३९५ कोटींचा कार्यारंभ आदेश जारी
खासदार धैर्यशील माने यांचा प्रकल्पाला गती मिळाली
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि ११ : पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. तब्बल ६०९ कोटी ५८ लाख रुपयांच्या निधीवर शासनाने मान्यता दिल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली असून, यामधील ३९५ कोटींच्या निविदा ‘इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि.’ या नामांकित कंपनीला मंजूर करून कार्यारंभाचा आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अधिकृत माहिती दिली.
हा प्रकल्प हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी, हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतींतील पंचगंगा नदीत सांडपाणी व रसायनयुक्त प्रदूषण थांबवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे. यासाठी औद्योगिक वसाहतींमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) सह उन्नतीकरण, क्षमता वाढवणे, सुमारे ८१ किलोमीटर पाईपलाईन लावणे आणि पुनर्वापर व्यवस्था सुधारण्याचे काम होणार आहे.
२०२२ मध्ये खासदार माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकल्पासाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेतली गेली आणि सप्टेंबर २०२४ मध्ये शासनाने ६०९.५८ कोटींचा निर्णय दिला. या निधीचा वाटप वस्त्रोद्योग विभागाला २५%, उद्योग विभागाला ५०% आणि पर्यावरण विभागाला २५% असा केला आहे.
‘इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि.’ कंपनीने यापूर्वी उत्तर प्रदेशातील रामगंगा नदी, काशी, मथुरा यांसारख्या ‘नमामी गंगे’ प्रकल्प तसेच राजस्थानमधील सांडपाणी उपचार केंद्रांची उन्नती कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले की, “हा प्रकल्प दोन वर्षांच्या आत पूर्ण होईल आणि झेडएलडी तंत्रज्ञानामुळे या औद्योगिक वसाहतीमधील एकही थेंब सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळणार नाही. यामुळे पंचगंगा नदीला नवजीवन मिळेल आणि औद्योगिक प्रगती व पर्यावरण संवर्धन यामध्ये समतोल साधला जाईल. मतदारसंघातील लोकांचे हे स्वप्न आता पूर्ण होईल.”
कार्यक्रमात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ईराप्पा नाईक, उपअभियंता अमित भुरले, इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर आभिषेक सिंग उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.