शेतकऱ्यांनी 150 ते 200 टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करावे

शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचे आवाहन

शिरोळ: राम आवळे  
दि .३ : शेतकऱ्यांनी १५० ते २०० टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच पाण्याचे योग्य नियोजन, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीचे प्रयत्न आणि तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करणे आवश्यक आहे. श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून सर्व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या असून चर्चासत्रे, मेळाव्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा आणि सेंद्रिय कर्ब .८५ ते १1% पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. श्री दत्त कारखान्याच्या वतीने क्षारपड जमीन सुधारण्यासाठी प्रयत्न होत असून शेतकऱ्यांनी जमीन क्षारपड मुक्तीसाठी उभा केलेल्या संस्थांना शासना कडून अनुदान मिळवणे कामी कागदपत्रांची पूर्तता करणे आणि इतर सर्व अडीअडचणी, समस्यांचा विचार करून त्यावर मार्ग काढण्यासाठी म्हणून ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
महालिंग पाटील, प्रवीण सूर्यवंशी, आप्पासाहेब पाटील, विनायक नरुटे, सतपाल खोंद्रे, के. आर. पाटील, गजानन गाताडे, सुभाष शहापुरे, शिरीष कागले, नंदकिशोर पाटील, बुद्धीराज पाटील यांच्यासह विविध भागातील शेतकऱ्यांनी क्षारपड मुक्तीसाठी आतापर्यंत झालेले काम, आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात आणि या कामी गणपतराव पाटील यांचे मिळालेले सहकार्य यांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी क्षारपडचे काम पूर्णत्वास गेले असून विविध पिके येत असल्याने आर्थिक नफा होत आहे. दादांच्या मुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून त्यांना नवी ऊर्जा मिळत आहे. जयसिंगपूर उदगाव बँक, वीरशैव बँकांच्या माध्यमातून गणपतराव पाटील यांनी क्षारपड मुक्तीसाठी उपलब्ध करून दिलेल्या कर्जाची शेतकऱ्यांनी दोन वर्षांमध्येच परतफेड करण्यामध्ये यश मिळवले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, शिक्षण होत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यामध्ये क्षारपड मुक्तीचे काम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गणपतराव पाटील हेच शेतकऱ्यांच्या मनातील भाग्यविधाते असून त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सर्व शेतकऱ्यांनी गणपतराव पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पर्यावरण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, साथी हसन देसाई, महेंद्र बागे, ॲड. प्रमोद पाटील, भैय्यासाहेब पाटील, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे यांच्यासह सुमारे २४ गावातील क्षारपड जमीन सुधारणा संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आभार ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.