लग्न म्हणजे व्यवहार नव्हे, विवेकाची निवड आहे!

जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प अभियानाची सांगता परिषद डोंबिवलीत संपन्न

ठाणे: प्रतिनिधी
दि.१४: जात, धर्म, कुंडली, प्रतिष्ठा आणि आर्थिक देवघेव यांवर आधारलेली विवाहसंस्था समाजातील विषमता अधिक खोल करत असताना, विवेक, समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जोडीदार निवडीचा ठाम संदेश देणारी जोडीदाराची विवेकी निवड  युवा संकल्प अभियानाची सांगता परिषद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जोंधळे विद्यासमूह यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली येथे उत्साहात व विचारप्रवर्तक वातावरणात पार पडली.
लग्नसंस्थेत खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धा, पितृसत्ताक मानसिकता, स्त्रीदमन, लैंगिक भेदभाव आणि कौटुंबिक दबाव यांविरोधात ठाम भूमिका मांडत या परिषदेत “जोडीदार निवड हा वैयक्तिक हक्क आहे, सामाजिक सौदा नाही” हा मूलभूत मुद्दा अधोरेखित करण्यात आला.या परिषदेसाठी अंनिसचे अध्यक्ष माधव बागवे, जोंधळे पॉलिटेक्निक कॉलेजचे सचिव देवेंद्र जोंधळे, प्रसिद्ध नाट्यनिर्माते व अभिनेते सुव्रत जोशी, अभिनेत्री शर्मिला शिंदे, समितीच्या राज्य सरचिटणीस आरती नाईक, अंनिसचे राज्य पदाधिकारी प्रा. मच्छिंद्र मुंडे, विजय परब, सुशीला मुंडे, नंदकिशोर तळाशीलकर, उत्तम जोगदंड, राज्य कायदे विभागाच्या ॲड. तृप्ती पाटील, राज्य निधीसंकलन विभागाचे सुधीर निंबाळकर, राज्य युवा कार्यवाह प्रियांका खेडेकर, अशोक निकम, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, युतक फाउंडेशनचे अनिल उकरंडे यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी, प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.परिषदेला मार्गदर्शन करताना अंनिसचे अध्यक्ष माधव बागवे म्हणाले,“जाती-जातींत लग्न न होणे, मुलींच्या निर्णयांवर बंधने, कुंडली व मुहूर्तांवर आधारलेले विवाह हे सर्व समाजाला मागे खेचणारे आहे. विवेकाच्या आधारे जोडीदार निवडणे ही केवळ वैयक्तिक बाब नसून सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे.”या अभियानाने गेल्या दहा वर्षांत राज्यभरात हजारो तरुणांशी संवाद साधत, लग्नसंस्थेतील अंधश्रद्धा तोडण्याचे आणि समानतेची बीजे पेरण्याचे काम केले आहे.असे मत व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या राज्य कार्यवाह रेश्मा खाडे म्हणाल्या की, १२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात आलेल्या युवा संकल्प अभियानाची ही सांगता परिषद असून, दहा वर्षांची लढाऊ वाटचाल पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी निर्धार अधिक ठाम झाला आहे .लैंगिक विविधतेलाही मान्यता  विवेकाची खरी कसोटी“भिन्न लैंगिकता आणि जोडीदाराची निवड” या सत्रात युतक फाउंडेशनचे अनिल उकरंडे यांनी समाजातील लैंगिक अल्पसंख्याकांवरील दुजाभाव, भीती आणि दडपशाहीवर प्रहार केला. लैंगिक विविधतेचा स्वीकार हीच विवेकी समाजाची ओळख आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.राज्य सरचिटणीस आरती नाईक यांनी संवेदनशीलता, परस्पर सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या तीन मूल्यांशिवाय विवेकाची निवड शक्य नाही. विवाहसंस्थेतील सामाजिक दबाव, कौटुंबिक हिंसा आणि ‘लोक काय म्हणतील’ या भीतीवर सडेतोड भाष्य केले.जोडीदाराची विवेकी निवड म्हणजे फक्त लग्नाची पद्धत बदलणे नव्हे, तर जातिव्यवस्था, पितृसत्ता आणि अंधश्रद्धांच्या मुळावर घाव घालणारी चळवळ आहे, हा संदेश देत परिषद  संपन्न झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.