राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोशल मीडियामुळे वातावरण तापले

संगमेश्वर,: नियाझ खान 

दि.१४: राजिवली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. विविध उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.अलीकडील काही दिवसांत उमेदवारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर विविध स्टेटस शेअर करण्यात आले. त्यानंतर विरोधी गटाकडूनही प्रत्युत्तरात्मक पोस्ट टाकण्यात आल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीचा माहोल अधिकच रंगतदार बनला आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका बैठकीत काही समर्थकांनी घराघरात जाऊन मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा दावा काही उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच, सरपंच पदाशी संबंधित एका जुन्या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर प्रशासनाने कारवाई केल्याची नोंद असूनही त्या प्रकरणात अद्याप न्यायालयात चार्जशीट दाखल झालेली नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवणारे किंवा ठाम आरोप करणारे संदेश प्रसारित करणे टाळावे, असे कायदेशीर तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक आचारसंहितेनुसार मतदारांना पैसे, भेटवस्तू किंवा इतर कोणतेही प्रलोभन देणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. तसेच, सोशल मीडियावर अप्रमाणित किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणेही नियमांचे उल्लंघन ठरू शकते. तक्रार प्राप्त झाल्यास निवडणूक विभाग आणि प्रशासनाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.

नागरिकांनी सोशल मीडियावरील माहितीची खातरजमा करूनच प्रतिक्रिया द्यावी, तसेच शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.