कापड व्यवहारात 27.83 लाखांची फसवणूक; राजस्थानमधील कंपनी संचालकांसह चौघांविरोधात गुन्हा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.११ :कापड व्यवहारातून विश्वास संपादन करून तब्बल २७ लाख ८३ हजार २२८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एका कंपनीच्या तीन संचालकांसह दलालाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत दीपक तेजराज पारीक (वय ३०, व्यवसाय- कापड खरेदी-विक्री, रा. २/६ पारिक हौसिंग सोसायटी, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४),३१६(५) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी म्हणून जेठाजी टेक्सफाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अनिरुद्ध सरजूप्रसाद गर्ग, अमरचंद रामस्वरुप गर्ग, सरजूप्रसाद रामस्वरुप गर्ग तसेच दलाल गोपाल मदनलाल पारिक (सर्व रा. प्रिती कॉलनी, बिडवानिया भवनजवळ, बालोत्रा, जि. बाडमेर, राजस्थान) यांची नावे नमूद आहेत.
फिर्यादीनुसार, आरोपींनी आम्ही संपूर्ण भारतभर कोट्यवधी रुपयांच्या ग्रे कापडाचा व्यापार करतो, आमचा मोठा व्यवसाय आहे, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. तसेच कापड मालाचे पैसे धनादेशाद्वारे अदा करू असे आश्वासन दिले. त्यानुसार आरोपींनी २३सप्टेंबर २०२३ ते २८ जुलै २०२५ रोजी रु २,०२,४०,,७८०,रुपये अदा केले. मात्र उर्वरित २७ लाख ८३ हजार २२८ रुपये देणे बाकी असताना वारंवार मागणी करूनही रक्कम अदा केली नाही. उलट “आज देतो, उद्या येतो” अशी आश्वासने देत वेळकाढूपणा केला.
याशिवाय ११ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपींनी फिर्यादीच्या भावाच्या व्हॉट्सॲपवर धनादेश आणि आरटीजीएस फॉर्मचा फोटो पाठवून पैसे पाठवत असल्याचे भासविले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही रक्कम जमा केली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
व्यावसायिक संबंधांचा गैरफायदा घेत, खोटे आश्वासन देऊन तसेच धनादेश व आरटीजीएसचे फोटो पाठवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादीने अपर पोलीस अधीक्षक, गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. चौकशी अहवालाच्या आधारे अपर पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) दीपक आनंदा माने करीत असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हेडकॉन्स्टेबल ९२४ कौलग यांनी पूर्ण केली.या घटनेमुळे इचलकरंजीच्या कापड व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, व्यावसायिक व्यवहारातील विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.