कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी -विजय मकोटे 
दि.५ जुलै २०२६ : हुपरी येथील  कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, हाफ पीच क्रिकेट स्पर्धा आणि इ. १० वी व १२ वीच्या परीक्षेतील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांना कारखाना व कामगार संघटनेच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
            सर्व कार्यक्रम कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. सानिका पाटील-यड्रावकर, व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, कामगार कल्याण मंडळ इचलकरंजीचे अधिकारी व महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण समितीच्या अध्यक्षा सौ. शाहीन चौगुले व मध्यवर्ती हातमाग विणकर सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे व कारखान्याचे संचालक आणि अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
          आवाडे दादांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार केला आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. इचलकरंजी येथे बेंदूर कमिटीपासून सुरुवात करून खासदारकीपर्यंत दादांनी अनेक पदे भूषविली आणि त्यातून समाजाच्या विकासाची मोठी कामे केली. आवाडे दादा म्हणजे जवाहर परिवारासाठी एक वटवृक्षच आहेत. त्यांनी जवाहर परिवाराकरिता चार दशके अविरत कष्ट केले आहेत, ज्यामुळे आज शेतकरी व कामगारांना एका चांगल्या संस्थेचा भाग होता आले आहे. कामगारांच्या मुलांनी मिळालेल्या या संधीचे सोने करून आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
              जवाहर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांना ‘महाराष्ट्र कामगार भूषण पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.कारखाना व युनियनच्या वतीने दादांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. सौ. सानिका पाटील-यड्रावकर यांचा कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून उच्चांकी मतांनी निवडून आल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
दादांच्या ९५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावर १०१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
      तुळशी ब्लड बँक, जयसिंगपूर व आधार ब्लड बैंक, इचलकरंजी आणि संजिवनी बल्ड बँक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ८१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
प्रास्ताविक जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले. आभार उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मानले, तर सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे व आण्णासो गिरीबुवा यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.