यंत्रमाग उद्योगांच्या वीज दर सवलत योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ द्या
आमदार राहुल आवाडे यांची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे मागणी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२८ जुलै २०२६ : इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमाग उद्योगांना दिल्या जाणाऱ्या वीज दर सवलत योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे केली आहे.इचलकरंजी हे महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचे प्रमुख केंद्र असून शहर व परिसरात हजारो लघु व मध्यम यंत्रमाग उद्योजक कार्यरत आहेत. या उद्योगावर लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणारी वीज दर सवलत ही यंत्रमाग उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. मात्र, अनेक उद्योजकांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. महावितरणच्या वीज जोडणीवरील नावांमध्ये दुरुस्ती, मालकी हक्काशी संबंधित कागदपत्रे तसेच उद्योगाशी निगडित इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागत आहे.
याशिवाय मध्यंतरी १५ ते २० दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे अनेक उद्योजकांना ऑनलाइन नोंदणी करता आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक पात्र यंत्रमाग उद्योजक या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची भेट घेऊन इचलकरंजीसह राज्यातील सर्व यंत्रमाग उद्योजकांच्या हिताचा विचार करून ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी केली.
यंत्रमाग उद्योगाला दिलासा देण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.