चार कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत; पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ

सांगली: अय्यान पटेल 

दि. १० : सांगली जिल्हा पोलीस दलाच्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे चार कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत करण्यात आला. यामध्ये १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि तब्बल २४ हजार ५०० किलो बेदाणा यांचा समावेश आहे. मुद्देमालाचे पारदर्शक व नियमानुसार हस्तांतरण केल्याने नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.खरे क्लब हाऊसच्या सभागृहात आयोजित मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजनकुमार शर्मा होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मुद्देमालाचे मालक व विश्वस्त उपस्थित होते.

           यावेळी शर्मा म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा लावणे यासाठी पोलीस दल कर्तव्यदक्षतेने काम करत आहे. तंत्रज्ञानाचा वापर तसेच केंद्र शासनाच्या विविध पोर्टलच्या माध्यमातूनही गुन्हे तपासाची कार्यवाही प्रभावीपणे केली जात आहे. आज सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात येत असून, अशा उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास निश्चितच वाढेल.

          नागरिकांनीही दक्ष राहावे. गुन्हा घडल्यास तातडीने ११२ क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच तपासासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शर्मा यांनी केले. पोलिस अधिकाऱ्यांनी मुद्देमाल हस्तांतरणाचे उद्दिष्ट निश्चित करून महिनावार संबंधितांचा ऐवज परत करण्यासाठी प्रयत्न करावेत. पीडितांना दिलासा देणे हेही पोलिसांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

           पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, गुन्ह्यांना प्रतिबंध आणि गुन्हे अन्वेषण हे पोलिसांचे प्रमुख काम आहे. मात्र, गुन्ह्यातील चोरीस गेलेली संपत्ती संबंधितांना परत मिळाल्यानंतरच पीडिताला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसून त्यामागे संबंधितांची भावनिक गुंतवणूक असते. त्यामुळे मुद्देमाल परत करताना नागरिकांना त्यांचे भावनिक मूल्यही परत केल्याची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

            अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी प्रास्ताविकात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख व नियमित पडताळणीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

                  पोलिसांच्या कामगिरीबद्दल नागरिकांकडून कृतज्ञता

          कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांच्या घरात १४ सप्टेंबर २०२५ रोजी चित्रपटातील घटनेप्रमाणे चोरी झाली होती. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व स्थानिक पोलिसांनी अवघ्या दोन-तीन दिवसांत मुद्देमाल परत मिळवून दिला. कार्यक्रमात हा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला. याबद्दल डॉ. म्हेत्रे यांनी पोलीस विभागाचे आभार मानले.

            बाणूरगड येथील रमाबाई शिवाजी गायकवाड यांचे हरवलेले गंठणही पोलिसांनी शोधून काढले. त्यांच्या वडिलांनी दिलेले हे गंठण त्यांच्या दृष्टीने केवळ दागिना नसून वडिलांचा आशीर्वाद होता. दीड वर्षांपूर्वी गंठण हरवल्याने त्या व्यथित झाल्या होत्या. ते पुन्हा मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस विभागाचे विशेष आभार मानले.दरम्यान, बिरोबा देवस्थानचे दागिने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ठेवण्यात आले होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी बँकेच्या शाखेत दरोडा पडून देवस्थानचे दागिने लुटण्यात आले होते. या मोठ्या चोरीचा जिल्हा पोलीस दलाने अवघ्या दोन महिन्यांत छडा लावून मुद्देमाल हस्तगत केला. हा मुद्देमाल आज देवस्थानच्या ताब्यात देण्यात आला. याबद्दल बिरोबा देवस्थान व ट्रस्टच्या वतीने विभूतवाडीचे माजी सरपंच तथा देवस्थानचे पुजारी चंद्रकांत पावणे यांनी पोलीस दलाचे आभार मानले.

                    सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले. मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी आभार मानले.गुन्ह्यांचा तपास, मुद्देमालाची जप्ती आणि त्यानंतर तो नियमानुसार संबंधित नागरिकांना परत करण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आल्याने सांगली जिल्हा पोलीस दलाचा हा उपक्रम लोकाभिमुख आणि उत्तरदायी पोलीस व्यवस्थेचा संदेश देणारा ठरला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.