गणेशोत्सव, रक्षाबंधनासाठी पर्यायी जागांचा लाभ घ्या : महापौर उदय धातुंडे
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१७: शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती तसेच गणेशोत्सव व रक्षाबंधनाशी संबंधित साहित्य विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विक्रेत्यांशी चर्चा करून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गणेशमूर्ती विक्रेत्यांसाठी लायन्स ब्लड बँकेसमोरील जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, गणेश चतुर्थीशी संबंधित विविध साहित्य तसेच रक्षाबंधनाचे साहित्य विक्रीसाठी वेध भवन येथे पर्यायी जागा निश्चित करण्यात आली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना अतिक्रमणामुळे होणारा त्रास टाळता यावा आणि सण-उत्सवाशी संबंधित विक्रेत्यांनाही व्यवसायासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.इचलकरंजीतील नागरिकांनी गणेशोत्सव व रक्षाबंधनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी जागांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उदय धातुंडे यांनी केले.
सण-उत्सव आनंदी, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात साजरे करण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि महानगरपालिका प्रशासन यांनी परस्पर सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही महापौरांनी सांगितले.यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुशांत कलागते यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.