‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ भावनेतून सावर्डे पोलिसांना राखी

रक्षाबंधनानिमित्त पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता; स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन

सावर्डे : सचिन पाटोळे 

दि .२९: समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ या भावनेतून सावर्डे पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी सावर्डे पोलीस ठाण्याचे अधिकारी आबासो पाटील तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. कुटुंबापासून दूर राहून दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या सेवेला यावेळी सलाम करण्यात आला.

             यावेळी सौ. पूजा शेखर निकम म्हणाल्या, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पोलीस बांधव आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

         दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस राखी अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी अजितदादांच्या कार्याला उजाळा देत जनसामान्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, विकासाची तळमळ आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी यांची आठवण करण्यात आली.

            यावेळी सौ. पूजा शेखर निकम यांनी अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नसल्याची भावना व्यक्त केली. “अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य व विचार कायम प्रेरणा देत राहतील. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना मन भावूक झाले,” असे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी दादांप्रमाणेच खंबीरपणे उभे राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

         राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांनीही अजितदादांच्या प्रतिमेस राखी अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. दादांचा प्रेमळ स्वभाव, बहिणींप्रती असलेली आपुलकी व आधार यांची आठवण काढताना महिला पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे प्रेम, आठवणी आणि कार्य सदैव आमच्या मनात जिवंत राहतील,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

         या प्रसंगी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पोलीस बांधवांना बांधलेली राखी आणि स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना वाहण्यात आलेली आदरांजली यामुळे रक्षाबंधनाच्या या उपक्रमाला सामाजिक बांधिलकी व भावनिकतेची विशेष किनार लाभली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.