ड्रग्स फ्री रत्नागिरी’साठी पोलिसांचा रेन रन; नशामुक्त समाजाचा संकल्प

रत्नागिरी : दीपक तूळसणकर 

 दि.३१: “मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करून रत्नागिरी जिल्हा नशामुक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या रेन रनला राज्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. यावेळी नागरिकांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच नशामुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला.


मॅरेथॉनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’चा संदेश देत सहभागी झालेल्यांनी अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांची देशातील उत्कृष्ट पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल यावेळी उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


रेन रनच्या माध्यमातून पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करत अंमली पदार्थांविरोधातील लढ्याला व्यापक लोकसहभाग मिळवून देण्याचा संदेश देण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.