आमदार राहुल आवाडेंच्या बदनामीप्रकरणी कायदेशीर नोटीस
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.८ : इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणादरम्यान चुकीच्या माहितीच्या आधारे तसेच अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करून आमदार राहुल आवाडे यांची नाहक बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार राहुल आवाडे यांच्या वतीने संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
इचलकरंजी महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर शहर महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी मदन कारंडे, उदयसिंग पाटील, संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, सचिन राणे, रणजीत जाधव, अमरजीत जाधव, संजय कांबळे, स्मिता तेलनाडे, यास्मिन तासगांवे, संगीता आलासे, पद्मा सावरतकर, सयाजी चव्हाण, शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, नितीन कोकणे, संभाजी सूर्यवंशी, शशिकांत देसाई, रवी गोंदकर, प्रताप पाटील, शिवाजी साळुंखे आदी उपस्थित होते.
उपोषणादरम्यान आमदार राहुल आवाडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणांमध्ये चुकीची व अपुरी माहिती तसेच अर्वाच्च भाषेचा वापर करून आमदार आवाडे यांची जनमानसात बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आला आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास कोणताही आक्षेप नसून, मात्र चुकीच्या अथवा अपुऱ्या माहितीच्या आधारे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक बदनामी करणे योग्य नाही, अशी भूमिका आमदार आवाडे यांच्या वतीने मांडण्यात आली आहे.
या प्रकरणाची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी उपोषणात सहभागी असलेल्या संबंधित सर्वांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटिशीला योग्य प्रतिसाद न मिळाल्यास संबंधितांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दिवाणी तसेच फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.