एसटी फेऱ्या बंद; १३० विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर!

गणपतीसाठी मुंबईला बसेस; ग्रामीण विद्यार्थ्यांना मात्र वाहतुकीच्या संकटात ढकलले — चिपळूण, देवरूख आगाराच्या कारभारावर पालकांचा संताप

संगमेश्वर: सचिन पाटोळे 

दि.९ : गणपती उत्सवासाठी मुंबईकडे अतिरिक्त एसटी बसेस वळविण्याच्या निर्णयाचा फटका आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक हायस्कूलच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांची नियमित एसटी वाहतूक बंद झाल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १० सप्टेंबरपासून चिपळूण व देवरूख आगाराच्या नियमित बसफेऱ्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणावर बसेस त्या मार्गावर वळविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सणाच्या गर्दीसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांचे शिक्षण वेठीस धरणे योग्य आहे का? असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.


पालकांनी संबंधित एसटी आगाराशी संपर्क साधला असता, १५ सप्टेंबरपर्यंत मुंबईकडे मोठ्या संख्येने बसगाड्या सोडाव्या लागत असल्याने स्थानिक मार्गावरील नियमित फेऱ्या सुरू ठेवणे अडचणीचे असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती पालकांनी दिली.मात्र, या निर्णयामुळे पंचक्रोशीतील सुमारे १३० विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने दररोज खासगी वाहनांची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यात विलंब होण्याची, तर काहींची शाळाच बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईच्या प्रवाशांसाठी बसेस उपलब्ध करून देताना ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बळी का? असा थेट सवाल पालकांनी केला आहे. एसटी ही केवळ प्रवासी वाहतूक व्यवस्था नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळातही विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार किमान आवश्यक फेऱ्या सुरू ठेवणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


‘     उद्यापासून फेऱ्या सुरू करा’, पालकांची ठाम मागणी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून उद्यापासून संबंधित एसटी बसफेऱ्या कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे एकही दिवसाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.  बसफेऱ्या सुरू ठेवणे शक्य नसेल तर विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था एसटी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा खासगी वाहनांचा अतिरिक्त खर्च पालकांच्या    माथी मारला जाणार असून, त्याचा थेट आर्थिक फटका ग्रामीण कुटुंबांना बसणार आहे.


      लोकप्रतिनिधी आता तरी जागे होणार का?
कुंभारखाणी बुद्रुक येथील विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासन शांत बसणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. चिपळूण व देवरूख आगारांनी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेनुसार आवश्यक बसफेऱ्या तातडीने सुरू कराव्यात. तसेच १५ सप्टेंबरनंतर सेवा पूर्ववत होणार असल्यास त्याचे स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
गणपती उत्सवासाठी मुंबईला अतिरिक्त बसेस द्या; पण त्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत मोजू नका. सण महत्त्वाचा आहेच; मात्र १३० विद्यार्थ्यांचे भविष्य त्याहूनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने कागदी कारणे न देता तातडीने तोडगा काढून बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.