‘गोकुळ’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षणाला प्रारंभ
गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढीसाठी दोन दिवसीय शिबिर; ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
कोल्हापूर: प्रविण भोसले
दि.५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या ताराबाई पार्क येथील स्व. आनंदराव पाटील-चुयेकर दूध व्यवसाय व पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र येथे संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे यांच्या हस्ते झाले. संघाच्या विविध विभागांतील सुमारे ५० अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
बदलत्या कार्यपद्धतीनुसार संघाच्या कामकाजातील जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ज्ञान व कौशल्यात वाढ करणे तसेच दैनंदिन कामकाजातील गुणवत्ता, सुरक्षितता आणि व्यवस्थापनाबाबत अद्ययावत माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे म्हणाले, ‘‘बदलत्या काळानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले ज्ञान आणि कौशल्य सातत्याने वाढविले पाहिजे. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष कामकाजात उपयोग करून संघाची कार्यक्षमता व गुणवत्ता वाढविण्यासोबत दूध उत्पादकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ तसेच हा कर्मचारी कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रम भविष्यात ही कायमस्वरूपी चालू ठेवावा असे त्यांनी सांगितले.
दोन दिवसीय प्रशिक्षणात विठ्ठल कोतेकर हे व्यक्तिमत्त्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन आणि संवाद कौशल्य या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. गोकुळचे प्रशिक्षण विभागप्रमुख डॉ. एम. पी. पाटील हे गोकुळची दूध संकलन पद्धती, सदस्य रचना आणि संघाची आजवरची वाटचाल याबाबत माहिती देणार आहेत.
याशिवाय कामाच्या ठिकाणची सुरक्षितता व सुरक्षा व्यवस्थापन, संघाच्या विविध सेवा-सुविधा, दुधातील घटक व गुणवत्ता नियंत्रण, अन्न सुरक्षा व भेसळ प्रतिबंध, स्वच्छता तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता व सुरक्षितता या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, विठ्ठल कोतेकर, डॉ. एम. पी. पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. दयावर्धन कामत, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, धनाजी पाटील, अमोल गडकरी, तनुजाराणी घाटगे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.