सा. रे. पाटील स्मृती कथा स्पर्धेत ‘दावण’ आणि ‘डंक’ प्रथम
देश-विदेशातून १५८ कथा; १५ कथांना विविध पुरस्कार जाहीर
शिरोळ : राम आवळे
दि.१० : स्व. आमदार डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्रा. जनार्दन बुटेरे (वाघोली, जि. ठाणे) यांच्या ‘दावण’ आणि सौ. संध्या धर्माधिकारी (सोलापूर) यांच्या ‘डंक’ या कथांना प्रथम क्रमांक विभागून मिळाला आहे. या स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून यंदा देशाच्या विविध राज्यांसह परदेशातूनही साहित्यिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण १५८ कथांमधून १५ कथांची विविध पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.

श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या प्रेरणेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यांतून तसेच परदेशातून कथा प्राप्त झाल्या होत्या. साहित्य सहयोग दीपावली अंकाचे संपादक सुनील इनामदार आणि मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
स्पर्धेतील अन्य पुरस्कारप्राप्त कथा पुढीलप्रमाणे :
द्वितीय क्रमांक विभागून सौ. निता माळी (हेरले) यांच्या ‘एकटेपणाचा वारसा’ आणि रमजान मुल्ला (नागठाणे, सांगली) यांच्या ‘बंदा रुपयाची गोष्ट’ या कथांना मिळाला.तृतीय क्रमांक विभागून सौ. अतुला मेहंदळे (नौपाडा, ठाणे) यांच्या ‘नात्याची श्रीमंती’ आणि अभिजीत देसाई (उत्तूर, कोल्हापूर) यांच्या ‘कडूकर आजी गोड हसल्या’ या कथांना मिळाला.
विशेष उल्लेखनीय कथांमध्ये गुरुप्रसाद दत्तात्रय रिसबूड (नृसिंहवाडी) यांची ‘शिक्षणाची ऐशी तैशी’, सोनिया कस्तुरे (सांगली) यांची ‘पालवी’ आणि संजय वसंतराव वारके (रुकडी, कोल्हापूर) यांची ‘कारभारी’ या कथांची निवड झाली.
उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी स्वाती बालुरकर देशपांडे (हैदराबाद, आंध्र प्रदेश) यांची ‘पडदा’, ऋषिकेश विटेकरी (शिरोळ) यांची ‘गंदी नाली का किडा’ आणि हर्षदा अशोक वाघ (इंदूर, मध्य प्रदेश) यांची ‘ढ’ या कथांची निवड करण्यात आली.उत्तेजनार्थ स्थानिक पुरस्कार निवृत्ती बामणे (मडिलगे, भुदरगड) यांच्या ‘म्हणे आम्ही स्वतंत्र झालो’, विजयसिंह शिंदे (कोल्हापूर) यांच्या ‘जप्ती’ आणि सौ. सुनंदा राजेंद्र कांबळे (जवाहरनगर, कोल्हापूर) यांच्या ‘सार्थ विश्वास’ या कथांना जाहीर झाला.
पुरस्कारप्राप्त कथांना ‘साहित्य सहयोग’ दीपावली अंकात प्रसिद्धी देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण समारंभ स्व. आमदार डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या जयंतीदिनी ११ डिसेंबर २०२६ रोजी होणार असल्याचे सुनील इनामदार व संजय सुतार यांनी सांगितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.