गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!

गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर गोकुळची झेप; गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ४१ हजार ९५२ लिटरची वाढ

कोल्हापूर,: प्रवीण भोसले 

दि . २६ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तब्बल २१ लाख ७० हजार ४७८ लिटर दूध विक्री झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ४१ हजार ९५२ लिटर म्हणजेच सुमारे ७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोकुळची दूध विक्री २० लाख २८ हजार ५२६ लिटर होती. यंदा दूध विक्रीत झालेली लक्षणीय वाढ ही गोकुळच्या गुणवत्तेवर ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे. दूध उत्पादकांचे सहकार्य, ग्राहकांची पसंती, प्रभावी मार्केटिंग नियोजन आणि सक्षम वितरण व्यवस्था यामुळे गोकुळच्या दूध विक्रीचा आलेख सातत्याने उंचावत आहे.


गोकुळ दूध संघाने दूध संकलनाबरोबरच दूध विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर विशेष भर दिला आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा आदी दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संघाच्या मार्केटिंग व वितरण विभागामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.
या यशामध्ये दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदार यांचे मोलाचे योगदान असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त झालेल्या या विक्रमी दूध विक्रीसाठी संघाच्या मार्केटिंग विभागाने प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली. याबद्दल डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील यांच्यासह मार्केटिंग विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी अभिनंदन केले.तसेच या यशाबद्दल सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतकांचे आभार मानून गोकुळ परिवाराच्या वतीने सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.